Sunday, May 29, 2011

ब्राह्मण हरवला आहे

"ब्राम्हण हरवला आहे"
लेखक - मनोज शिवराम लोंढे

स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.

कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर हजारो वर्षे अन्याय केलात,
आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत.
इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे.
आम्ही अजून काही पिढ्या अंधारात खिचपत पडलो असतो.

जोशी: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरच!! पण अन्याय फक्त ब्राम्हणांनी केला
का? इंग्रजांच्या राज्यात जातीयवाद करणे चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले.
त्यांनी समाजप्रबोधन केले. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?

कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.
जोशी: हो बरोबर आहे. पण अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत?
कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?

जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव,
तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी
एकोप्याने, समतेने, गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले
ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.

कांबळे: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. "मानवता धर्म" हाच श्रेष्ठ
धर्म मानला जात आला आहे.

जोशी: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, "नव्हे", त्यांचंच
१००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि
प्रजेला सुरक्षित केले, अभय दिले.

कांबळे: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकापासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.
जोशी: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!

कांबळे: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले.
Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य.

जोशी: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून
हिणवायचे, आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो
कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं,
म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला.
स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राम्हणांना झोडपू
लागले. कारण अगदी Alexander च्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राम्हणांना
वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.

कांबळे: पण इंग्रजांमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.
जोशी: थांबा !! हे अर्धसत्य आहे. इंग्रजांच्या काळात समता येऊ लागली हे खर पण इंग्रजामुळे समता आली हे खोटे. त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते?
कांबळे: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?
जोशी: Hmm!! अहो कांबळे, फुले ह्यांच्या बरोबरीने लोकहितवादी देशमुख, आगरकर, रानडे, रेवेरंड टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांच्या बरोबरीने, सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत. सावरकरांनी स्पष्ट सांगितले होते, की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता.
कांबळे: ठीक आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते. पण मला सांगा, किती भटांनी दलितांशी लग्ने केली?
जोशी : सगळ्यात प्रसिद्ध उदाहरणे द्यायची तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पत्नी जातीने ब्राह्मण होत्या. श्री रामदास आठवले ह्यांच्या पत्नी माहेरच्या काशीकर ह्या जातीने ब्राह्मण होत्या. श्री रामदास आठवले ह्याचे सासरे श्री काशीकर ब्राह्मण होते व त्यांनी ३०/ ४० वर्षांपूर्वी एका दलित कन्येशी विवाह केला होता. ही ठळक उदाहरणे झाली. अशी शेकड्यावारी उदाहरणे मी तुम्हाला देऊ शकतो. “Cast is no longer an issue for brahmins”. आता मला सांगा, की किती "ब्राह्मणेतर" उच्चवर्णीयांनी दलितांशी लग्ने केली आहेत?
कांबळे : फारच थोडे. अहो जोशी आमच्यातल्याच पोटजातींमध्ये अजून आपापसात लग्ने होत नाहीत.
जोशी: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ९-१० वर्ष काम करतो आहे; तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा हो, दुजाभाव तरी केला का कधी ?
कांबळे: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी
एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही.
आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.

जोशी: बर!! धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण
तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे.
मला सांगा, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राम्हणाने अन्याय केला का?
कांबळे: नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे
वडील शिकून मोठे वकील झाले.

जोशी: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राम्हणांनी अत्याचार केला का?

कांबळे: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार
करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.

जोशी: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःवर, स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून,
स्वार्थी, फसव्या अशा पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राम्हणांनी अन्याय केला, असा ओरडा का
करता?

कांबळे: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच
आहेत ना?

जोशी: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात ब्राम्हण होते का? एकही नव्हता. हे मी नाही सांगत,
सरकारी पुरावे बोलत आहेत.

कांबळे: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.

जोशी: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राम्हणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती
आहे. कारण ब्राम्हण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही.
आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल “शिक्षण” बर, आपल काम बर, आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बरे.
कांबळे: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय.
भटाला त्याचे सोयर - सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात
तसा, "भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत".
जोशी: ब्राम्हण असे का झाले? ह्याचा विचार केलात? हा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!
कांबळे: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, सावरकर, कान्हेरे, गोखले, आगरकर,
एस एम जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.

जोशी: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राम्हण
होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना
दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.

कांबळे: (पुन्हा निःशब्द) पण जोशी, गांधीजींना गोडसेने मारले. तोही भटच होता.
जोशी: गोडसेने गांधीजींची हत्या केली. त्यानंतर गावोगावी ब्राम्हणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या चूकीने हजारो ब्राम्हणांचे निःस्वार्थी बलिदान फोल ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.
कांबळे: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य
बुडवलच ना?

जोशी: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव,
नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पिढ्या न पिढ्या इमाने - इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा अटकेपार म्हणजे
अफगाणिस्थान पर्यंत मराठी सत्ता नेली. पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राम्हण देवासारखे पूजतात. पण पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलट त्यांना बदनाम केले जाते.

कांबळे: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात,
राजकारणात का येत नाहीत.

जोशी: ब्राम्हण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे.
ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राम्हण स्वतः कोषात गेला
म्हणा. ब्राम्हणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग, बलिदान करून पदरी काय
पडल? अवहेलना? तिरस्कार? त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर.

कांबळे: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या
वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून
कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती चुकीची नाही वाटत
तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा वसा घेतलाच पाहिजे. थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल. कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी, पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.
जोशी: आज इतकी वाईट परिस्थिती आहे की , २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता, महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद उकरला. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हतेच असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. आता तर त्यांनी पालिकेत ठराव करून लाल महालातूनही पुतळा काढून टाकला आहे.
कांबळे: जेम्स लेनच्या कानाशी भांडारकर institute मधल्या काही लोकांनी घाणेरडी कुजबुज केली आणि त्या लेनने पुस्तकात काही बाही लिहिले म्हणून लोक चिडले.
जोशी: चिडलच पाहिजे. अशी निर्लज्ज कुजबुज करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे आणि जेम्स लेनचे पुस्तक “Hindu King in Islamic India” कायमचे “BAN” केले पाहिजे. पण ह्यात दादोजीना मरणोत्तर शिक्षा का म्हणून? त्यांनी शहाजीराजे, जिजाऊसाहेब आणि महाराजांची इमाने इतबारे सेवा केली म्हणून? बर हे लोक फक्त दादोजींवर थांबणारे नाहीत. ह्यांच्या दृष्टीने, रामदासस्वामी व महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे, रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय आणि आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह! किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही.
कांबळे: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम
महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी
आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ
रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.

जोशी : पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच
गोष्टी सुचणार दुसर काय.

कांबळे: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.
जोशी: ब्राम्हणांनी "मौनं खलु साधनं" हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर. मी तर सर्व ब्राह्मण संस्थांना असे आव्हान करतो आहे की त्यांनी सर्व ब्राह्मण युग पुरुषांचे सार्वजनिक जागांवरचे पुतळे स्वतः होऊन हलवावेत आणि संस्थेच्या आवारात आदराने सुरक्षित ठेवावेत. कारण मराठी जनतेच्या मनात जातीभेदाचे विष कालावणाऱ्या ह्या पापी भ्रष्ट पुढारी लोकांचे हात आज न उद्या ह्या पुतळ्यांवर पण पडणार आहेत.
कांबळे: अहो, पण हे घातक आहे. चुकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.
जोशी: हल्ली पाप - पुण्य, खर - खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाश
आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.

कांबळे: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हव. ही राजकारणात
पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला
हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल, खरी समता साधेल.
जोशी: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता
ब्राम्हणांनी राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ही जबाबदारी ब्राम्हण स्वीकारतील अगदी गेला बाजार” निवडणूक प्रक्रीयेमध्ये सक्रीय होतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात बोलणे व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर
येण्याची सुरुवात इथूनच होईल असा विश्वास वाटतो आहे.

मनोज लोंढे
mslondhe@rediffmail.com

Friday, December 4, 2009

"मोहमाया झाली वेडी"

"मोहमाया झाली वेडी"

लेखक : मनोज लोंढे

पात्र परीचय : श्री - ४० - ४५ वर्षांचे, सौ : ४० वर्षांच्या

सौ : बाई! बाई! बाई! हे सगळे channels म्हणजे अश्लीलतेचे, बीभत्सपणाचे कळस आहेत.
मुलांसमोर, मोठ्यांसमोर चुकून जरी लागले तरी थरकाप उडतो. आपली संस्कृती नष्ट
करायलाच निर्माण झाले आहेत हे सगळे.

श्री : अग त्याचं म्हणन असतं की मागणी तसा पुरवठा. लोकांनाच हे सर्व हवं आहे, असा ह्या
channel वाल्यांचा दावा आहे.

सौ : काय हो, असं अश्लील सर्व कुटुंबासह बघायला कोण सांगत असतील? काय त्यांचे ड्रेस
काय त्यांचे संवाद.

श्री : अग, मी पूर्वी बायकांना माया, ममता याचं रूप समजायचो. म्हणजे, मायावती आणि
ममतादिदी नव्हे, खऱ्या माया ममता म्हणायचं आहे मला. पण एकता कपूरने सिद्ध केल
आहे की बायका ह्या सर्व कट कारस्थानाच्या मूळाशी असतात. पुरुष हे फक्त घाण्याचे
बैल असतात.

सौ : हो S S !! तुम्हा पुरुषांना एकता कपूर अगदी बरोबर सापडली आहे आम्हा बायकांना
टोमणे मारायला.

श्री : अग ती एकता कपूर काय घेऊन बसलीस, सगळे news channels हेसुद्धा बीभत्स रसाचे
पुजारीच आहेत, असं माझ ठाम मत झाल आहे. नाहीतर मिठी नदीच्या पुरात मरण
पावलेल्या नातेवाईकांना त्यांनी "आपको कैसा लग रहा है" वा त्यांच्या घरी जाऊन "आईये
देखते है इनके घरका माहौल कैसा है?" असे निर्बुद्ध प्रश्न विचारले नसते.

सौ : अरे पण हे असाच चालू राहिलं, तर आपली पातळीही त्यांच्यासारखीच होईल!! आणि
लहान मुलाचं काय? किंवा टीन एजर्सच काय?

श्री : त्यावर एकाच तोडगा आहे, तो म्हणजे TV बंद करणे आणि वाचन संस्कृती वाढवणे.

सौ : हा निर्बुद्धपणा, चकचकीतपणा ९१/ ९२ नंतर सुरू झाला असं नाही वाटत तुला?
श्री : अगदी बरोबर. १९९१ च्या अगोदर आपला भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी
world bank आणि IMF च्या दबावाखाली आपल्याला समाजवादाची कास सोडून
भांडवलशाहीची वाट धरावी लागली. आणि भारतात शिरला भोगवाद, चंगळवाद, पेज थ्री
संस्कृती. "In other words problem of plenty".

सौ : म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे?

श्री : सांगतो. १९९१ च्या अगोदर भारतात समाजवादावर आधारीत अर्थव्यवस्था होती. पंडीत
नेहरूंच्या रूपात आपल्याला स्वप्नाळू पंतप्रधान लाभले. त्यांनी साम्यवादी भारताचे स्वप्न
पाहीले, जिथे कोणी उच्च नसेल, नीच नसेल. सर्व समान असतील. कसलाही भेदभाव
नसेल. सर्वधर्मसमभाव असेल. भारत जागतीक शांतीचे प्रतीक असेल.

सौ : हो. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य, किती छान वाटत ऐकायला. असा समाज खरोखरच
जर झाला तर सर्व किती सुखात राहतील नाही?

श्री : बरोबर. त्यांनी Karl Marx च्या साम्यवादावर आधारीत सरकारी कंपन्या काढल्या.
सरकारने उद्योगधंद्यात पैसे ओतले.

सौ : ह्यामागे त्यांचा हेतू जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा, सर्वजण सुखात राहावेत हाच
होता.

श्री : मान्य आहे. पण साम्यवादी रशियात जे झालं, तेच भारतात झालं. कारण लालच, हाव, हा
माणसाचा गुणधर्म आहे. साम्यवादामध्ये गधे घोडे सब बराबर, हे महत्वाकांक्षी लोकांना
मानवत नाही. त्यांना सर्वांपेक्षा जास्त, उच्च असं काहीतरी हवं असतं.

Scene 1 : सरकारी अधिकारी गरीबाला नडतो आहे. पैशासाठी अडवणूक करत आहे.
आणि तेव्हड्यात एक धनदांडगा तिथे येतो, त्याची हा सरकारी अधिकारी सरबराई करतो.

Scene 2 : बांगलादेशी घुसखोरांना राजकारणी आणि रेशनिंगचे अधिकारी पैसे खाऊन
संगनमताने रेशन कार्ड वाटत आहेत.

Scene 3 : न्यायाधीश लाच खाऊन, खऱ्या गुन्हेगाराला सोडून देतो आहे. ज्यांच्यावर अन्याय
झाला आहे ते लोक हताशपणे रडत आहेत. गुन्हेगार खुनशी हसत वकील आणि
न्यायाधीश दोघांना पैशांनी भरलेल्या ब्यागा देतो आहे.

Scene 4: टेलीफोनचे ऑफिस : १५ वर्षांपूर्वी बुक केलेला फोन अजून का आला नाही हे
विचारायला आलेल्या इसमाला अधिकारी सांगतो, अहो इतकी लाईन आहे, की अजून
पाच वर्षे विसरा. तो इसम टेबलाखालून ५०० रुपये सरकवतो. आणि तोच अधिकारी
त्याला लगेच फोन देतो.

श्री : समतेच्या नावाखाली खाजगी धन्देवाल्यांवर भरपूर कर लादले होते, आणि मोठी जबाबदारी
असलेल्या अधिकाऱ्यांना तुटपुंजे पगार दिले जात होते. म्हणून हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर
उभा राहीला.

सौ : म्हणजे तुला म्हणायचं आहे की जबाबदारी जितकी मोठी तितकाच पगारही मोठा हवा?

श्री : आणि भ्रष्टाचारात पकडलं गेल्यास, शिक्षाही जबर हवी. पण आपल्याकडे बक्षीसही कमी
आणि शिक्षाही मामूली. त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित पळवाटा ठेवलेल्या. कुंपणच शेत
खात आहे म्हटल्यावर काय बोलणार?

सौ : दुसराही एक मोठा दुष्परिणाम झाला. सरकारच्या साम्यवादी विचारसरणीमुळे,
कामगारांना कायद्याचे मोठे संरक्षण होते. पण "अति तिथे माती" म्हणतात ना!!
कामगार पुढाऱ्यांनी ह्या कायदेशीर संरक्षणाचा गैरफायदा घेतला

श्री : आणि सरकारने कामगार पुढाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्याकडे, त्यांच्या गुंडगिरीकडे
नेहेमीच दुर्लक्ष केलं. त्यामुळे काय झालं?

Scene 5 : एक कामगार ( गळ्यात सोन्याची चेन, हातात जेव्हढी बोटे तेव्हढ्या अंगठ्या,
ब्रेसलेट घालून गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत दारू पिऊन तर्र होऊन नाचतो. दुसऱ्या
दिवशी सकाळी हा कामगार कामावर झोपतो. supervisor त्याला suspend करतो. लगेच
कामगार पुढारी "मोडेन पण वाकणार नाही" "लाल बावट्याचा विजय असो", अशा घोषणा
देत संपावर जातात.

श्री : त्या कामगारांच्या राहणीवरून आपल्या लक्षात आलेच असेल, की समस्त कामगार
मंडळींना व्यवस्थित पगार होते.

सौ : पण क्षुल्लक कारणांवरून त्यांनी संप केले, मारामाऱ्या केल्या. आणि बरेचसे कारखाने बंद
पडले. आणि कामगार बेकार झाले. पण त्यांचे राजेशाही शौक मात्र कायम राहीले.


Scene 6 : कफल्लक कामगार दारूसाठी बायकोला त्रास देतो, मुलं रडताहेत. बायको म्हणत, मी
१० घराची धुनी भांडी करून घरात पोटाला पैसा आणते, आणि तू, पोर बाळ काही न
बघता दारूत सर्व पैसे घालवतोस.

श्री : अशा या संपकारणांमुळे, ८० - ९० च्या दशकात बरेचसे उद्योगधंदे बंद पडले. बर, subsidies
तशाच चालू राहिल्या. आणि देशाच्या अर्थकारणाची पार वाट लागली.

सौ : आणि मग सरकारच्या लक्षात आलं की, शास्त्रज्ञांना सैबेरियात डांबणाऱ्या आणि लाखो लुळ्या
पांगळ्या आणि म्हाताऱ्यांना मारून टाकणाऱ्या स्टालिनच्या रशियाचे अंधानुकरण आता
थांबवलं पाहिजे.

श्री : १९९१ साली भारत नाईलाजाने म्हण किंवा बळजबरीने म्हण, भांडवलशाहीकडे वळला. नंतर
५/६ वर्षात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, "संप करणे बेकायदेशीर आहे". मग काय?,
सर्व भांडवलदारांची टोटल ऐष सुरु झाली.

Scene 7 : गुजराथी/ मारवाडी मालक, मराठी कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची बळजबरी
करतो. मराठी कामगार १० - १२ लाख रुपये घेऊन बाहेर पडतो. दुसऱ्या दिवसापासून बिहारी,
बांगलादेशी अनाडी मजूर कंत्राटी कामगार म्हणून येतात. महिना रु. २००० ची बोली ठरते.
मजूर जी हुजूर करतो. मजूर गेल्यावर मालक छद्मी हसतो. घणो फायदो! घणो फायदो!
असे चित्कारतो.

Scene 8 : दोन गुजराथी कारखानदार पार्टीत दारू पीत बसले आहेत. संवाद : मराठी मामाने
VRS आपी दी. हवे भैया अने बांगलादेशी गुलाम "बे हजार रुपया महिना मा काम करेछे.
हवे बऊ फायदो ठाये छे. बे वरस मा हू nariman point मा पाच घर लिदो. अने हावे
मारी पासे ८ luxury car छे.
तेव्हढ्यात अजून एक धनदांडगा धावत येतो, म्हणतो, "ओये मेरे गड्डी के नीचे अभी
आते वखत चार पाच मजदूर कुचल गये.
तिघे छद्मी हसतात. आणि म्हणतात, मुक्ती मिली सालोको. CHEERS!!!

Scene 9 : Officers सकाळी ९ ते रात्री १० पर्यन्त राबताहेत. पगार बक्कळ, पण त्याचा उपभोग
घ्यायला वेळच नाही. बायकाही नोकरी करताहेत. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही.
couch potato मुले TV बघताहेत. आईवडील घरी आल्यावर मुले त्यांच्याकडून वेळ नाही
तर पैसे वसूल करतात. ICE CREAM, hotelling, credit card, car लोन यामुळे कर्जाचा
विळखा पडतो आहे. आणि उधाराची सूज शेवटी उरतेच.

श्री : काही विशिष्ट लोकांकडे लांड्या लबाड्या, भ्रष्टाचार करून पैसा एकवटणे. ते लोक त्यामुळे
माजून जाणे; त्यांनी इतरांना भिकारी समजणे. हे बरोबर आहे का? ९०% लोकांकडे पैसे
नसणे हे बरोबर आहे का?

सौ : नाही, मुळीच नाही.

श्री : आणि त्या मजूरांबद्दल काय वाटत?

सौ : अरे कार्ल मार्क्सने असेच चित्र १५० - २०० वर्षांपूर्वी युरोपमध्ये बघितले.

श्री : बरोबर. वैज्ञानिक आणि वैचारिक reneissance मुळे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली
होती. तिथल्या मजुरांना भांडवलदारांनी १८ - १८ तास राबवले होते, तुटपुंजे पगार दिले
होते. मुंबई सारखी तिथेही झोपडपट्टी त्यावेळी युरोपात अस्तित्वात होती.

सौ : मजुरांचे हाल कार्ल मार्क्स ला बघवले नाहीत. त्याने "दास कॅपिटा" हा ग्रंथ लिहिला.
आज त्याच्याच मुळे आपल्याला ८ तास काम, रविवारची सुट्टी व minimum wages
मिळत आहेत.

श्री : आणि ह्याच गोऱ्या भांडवलदारांनी त्यांच्या सरकारच्या सहाय्याने अख्ख्या जगाला गुलाम
केलं. का? तर ह्यांच्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल आणि कारखान्यातील
उत्पादनासाठी बाजारपेठ हवी होती. त्याकरता त्यांनी अख्ख्या जगावर वरवंटा फिरवला.
आपापसात दोन महायुद्ध लढले.

सौ : त्या पापाची फळे त्यांची आजची पिढी भोगते आहे. भणंग अवस्थेत चरस पिऊन कुठेही
पडीक असण. लग्न नाही, संसार नाही, अनौरस मुळे, कुमारी माता, एड्स, पुरती बोम्ब
आहे पाश्चिमात्य देशात.

श्री : आणि म्हणूनच तिथले सुसंस्कृत लोक, भारतीय संस्कृती, विवाह संस्था, परिवारातील
ऋणानुबंध संस्कार ह्यांचे गोडवे गातात. आणि आपण काय करतो आहोत?

सौ : पाश्चिमात्यांच्या वाईट गोष्टींचे अंधानुकरण. फुटकळ कारणांवरून घटस्फोट. नवरा
बायकोमध्ये समता आली हे चांगले झाले, पण त्याचा अर्थ नवऱ्याबद्दल किंवा बायकोबद्दल
आदरभावना न ठेवणे असा होत नाही.


श्री : अग! घटस्फोट हा आपल्या पिढीचा प्रश्न झाला. आता आपल्याकडे नवीन फॅडस आली
आहेत. लिव इन रिलेशनशिप, कुमारी माता, gay marriage .दळभद्री लक्षणे नाही तर
काय? आपली पवित्र, शुभ, मंगलमय संस्कृती सोडायची, आणि अभद्र, अमंगळ, कुलक्षणी
भोगवाद, चंगळवाद घ्यायचा. स्वतःच्या मोहासाठी, लोभासाठी जगायचे आणि त्यातच
मरायचे.

सौ : बर, अशांना काही सांगायला जावं तर ते आपल्याकडे कोणीतरी गावन्ढळ असल्यासारखे
पाहतात. आणि म्हणतात आमचा विश्वास नाही धर्मावर. धर्म वैगेरे its all क्राब. वेद काय
भानगड आहे? लग्न, बंधन वगैरे बुरसटलेले विचार आम्ही मानत नाही.

श्री : हे राम! हे काय चाललय? आणि हा बदल इतक्या झपाट्याने होतो आहे? २० वर्षांपूर्वी
दारू पिणे हे असभ्य, असंस्कृत मानले जायचे. आता drinks चे विविध प्रकार त्यावरील चर्चा
आणि त्याचे सेवन हे सभ्यतेचे "नवे" लक्षण झाले आहे. पुढच्या पिढीबद्दल भीती वाटते ग!
आज पाश्चात्य भोगवाद काही लोकांपुरता मर्यादित आहे. पण अख्ख्या समाजात हा
भोगवाद, चंगळवाद पसरला तर काय होईल.

सौ : काय व्हायचंय? अनिर्बंध समाज, भोगी, उन्मत्त समाज. "माज असेपर्यन्त भोगी; अति
भोग भोगून झाल्यावर माज उतरतो, आणि मग उरतो, रोगी; मानसिक आणि शारिरीक”.

श्री : आणि असा बेताल, माजोरडा, चंगळवादी, उन्मत्त समाज पहिला की समजत की, आपल्या
किंवा कोणत्याही धर्माने जी बंधने घालून दिली होती, ती समाजाच्या स्वास्थ्याकरता,
कल्याणाकरता होती.

सौ : अगदी माझ्या मनातलं बोललास. त्यातलं पहिलं बंधन होत, "मौजी बंधन" वयाच्या
७ वर्षांपर्यंत लहान मुलांना खेळू, बागडू द्यावं; त्यांना थोर लोकांच्या गोष्टी सांगाव्या.
अजाणतेपणे चांगले संस्कार करावे. कारण लहान वयात केलेले संस्कार हे ओल्या मातीवर
झाल्याने पटकन होतात आणि कायम टिकतात. ७ वर्ष पूर्ण झाल्यावर “मुलामुलींच्या” मजेवर
बंधन आणून, म्हणजेच त्यांची मुंज करून, त माया ममता बाजूला ठेऊन सर्व मुलांना गुरूगृही
जावे लागे. मुलीही त्याकाळी शिक्षण घेत. त्याही कर्तुत्ववान असत. पण पुढे भारतावर
झालेल्या अनेक आक्रमणांमुळे, मुलींना संरक्षित ठेवण्याच्या "माये" मुळे पुढे स्त्री शिक्षण
बंद झाले.

श्री : आज ही ब्रह्मचर्याश्रमाची प्रथा सुरू करायला हवी. कारण आज आई, वडील नोकरी करतात.
त्यामुळे मुलांवर संस्कार करायला घरी आजी आजोबा नसले, तर कोणीच नसतं. आणि
त्यामुळे मुलं TV बघत बसतात, आणि त्यातून नको त्या गोष्टी पटकन घेतात. त्यापेक्षा
त्यांना मुंज झाल्यावर "चांगल्या" बोर्डिंग शाळेत टाकणच योग्य. त्यामुळे मुलांचे "अतिलाड"
ही कमी होतील.

सौ : पूर्वी गुरूगृही सर्व समान असत. राजाचा मुलगा असो वा गरीबाचा. "स्वावलंबन", "समता",
"बंधुत्व", "एकमेकांना मदत करून सत्कार्य करणे", हे गुण अगदी नकळत, सहजतेने,
NATURALLY मुलांच्या अंगात भिनायचे.

श्री : हो वेदकाळात जातीभेद नव्हता. हल्ली आहे त्याप्रमाणेच शिक्षण व आवड यावर आधारीत
चातुर्वर्ण निश्चितपणे होता. चातुर्वर्ण जन्मावर आधारीत नव्हता. जन्माधिष्ठित जातीव्यवस्था
ही नंतर काही स्वार्थी मंडळींनी नंतर काळाच्या ओघात रूढ केली.

सौ : गुरुकुलात सूर्य नमस्कार, योगाभ्यास, युद्ध शास्त्र, कृषिशास्त्र, वेदाभ्यास, राजकारण, गणित,
अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र इत्यादी विषय "वानप्रस्थी" गुरुजन, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न
ठेवता शिकवत. मुलं "मानसिक", "शारीरिक" आणि "व्यावहारिक" दृष्ट्या सक्षम बनत.
ज्ञानाने परिपूर्ण होत.

श्री : अशी शिकून प्रगल्भ झालेली मुलं "गृहस्थाश्रमात" प्रवेश. ते एका पवित्र "विवाह बंधनात"
बांधले जात. अग्निसाक्षीने एकमेकांना जन्मभर "आदरपूर्वक" साथ देण्याची शपथ घेत.
"कामवासना" ही नैसर्गिक असून, पवित्र विवाह बंधनात राहून एकाच जोडीदाराबरोबर
कामवासनेचा उपभोग घ्या. पशूप्रमाणे वासनामय होऊ नका हा उपदेश असे.

सौ : असे जाणते, विद्याविभूषित स्त्री व पुरुष कर्तव्यरत होत. अगदी आजच्यासारखेच. स्वतःचा,
स्वतःच्या कुटुंबाचा सर्वार्थाने उत्कर्ष साधत. राजाचा २५% कर देत. आणि शिवाय १० %
देवळात देत असत.

श्री : ह्या पैशातून "नालंदा", "तक्षशीला" सारखी विद्यापीठे, गरिबांसाठी अन्नछत्रे, वाटसरुंकारता
धर्मशाळा चालवल्या जात असत. आज किती जण १० % त्याग करतात?

सौ : हल्ली आपण सगळे "स्वकेंद्री" झालो आहोत. शेतकरी आत्महत्या करतोय. पण आम्हाला
अन्नपदार्थ महाग मिळताहेत. ह्याचा अर्थ मधले दलाल, राजकारण्यांच्या आशीर्वादाने दोघांना
नाडताहेत, तरी आम्ही गप्प. राजकारण्यांना जाब नाही विचारणार. मला काय त्याचे?
मुंबईबाहेर लोड शेडींग आहे. मला काय त्याचे? मी भरपूर TV पाहणार. वीज जाळणार.
सौ : हा त्यागाचा वसा ख्रिश्चन लोक नेमाने पाळतात. ते लोक १० % नेमाने चर्चला देतात.
त्यातूनच जगभर मिशनरी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये उभी राहतात. ही अत्यंत चांगली
गोष्ट आहे.

श्री : तर थोडक्यात, गृहस्थाश्रमात अर्थार्जन करत, कौटुंबिक सुख घ्यायचं, कुटुंबाची वृद्धी,
समृद्धी, पालन पोषण करायचे आणि समाजासाठी १० % त्याग करायचा. आज आपण सर्वांनी
ठरवलं, की समाजासाठी १० % त्याग करायचा, तर किती चांगल्या गोष्टी घडू शकतील.

सौ : गृहस्थाश्रमानंतर ५५ - ६० वयाची माणसे वानप्रस्थी होत.

Scene 10 :

६० वर्षांचे पुरुष व त्यांच्या ५५ वर्षांची बायका म्हणताहेत :
आजवर फक्त १० % त्याग केला. यापुढे ५० % संपत्ती मुलामध्ये समान वाटून, ५० % संपत्ती समाजासाठी वापरणार.
एक जोडपं म्हणत : आम्ही गुरुकुलात शिकवायला जाणार.
दुसर जोडपं म्हणत : आम्ही ग्रंथालयाची व्यवस्था, लेखन करायला जाणार.
तिसर जोडपं म्हणत : आम्ही धर्मशाळेची व्यवस्था बघायला जाणार.
चौथ जोडपं म्हणत : आम्ही रुग्णालयात सेवा करायला जाणार.

आमचं ज्ञान, अनुभव, पुढच्या पिढीला समाजाला उपलब्ध करून देणार. चांगले आदर्श पुढच्या पिढीच्या डोळ्यासमोर ठेवणार. त्यांना चांगले संस्कार देणार. ज्याने समाजाचे कल्याण होईल आणि त्याच बरोबर आमच्या हातून सत्कर्म घडल्याचे समाधान आम्हाला मिळेल. स्वार्थाची कास हळू हळू सुटेल ज्यामुळे आमची पावले मुक्तीच्या मार्गाकडे वळतील.
श्री : अस २० - २५ वर्ष ज्ञानदान, लिखाण, सेवा इत्यादी सत्कर्म केल्यावर माणस ७५ व्या वर्षी संन्यास घेत.

Scene 11 :

७५ वर्षांचे स्त्री पुरुष म्हणताहेत :

आजवर आम्ही स्वतःसाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी जगलो. ह्यापुढे आम्ही ईश्वर भक्तीत लीन होणार सर्वांसाठी "शांती, समृद्धी, स्थैर्य आणि आरोग्य याची प्रार्थना करणार. ध्यानधारणा करणार. कुंडलिनी शक्तीचा अनुभव घेत ईश्वरशक्तीमध्ये विलीन होणार. मृत्यूपूर्वीच सगळ्या इच्छा सोडून देणार. कारण मृत्युनंतर आत्म्याला देह नसला तरी त्याच्याबरोबर इच्छा मात्र तशाच राहतात. पण शरीर नसल्याने आत्मा इच्छा पूर्ण करू शकत नाही. आणि आत्म्याची तडफड होते. ह्यालाच नरक यातना म्हणतात. आणि अशा नरक यातना भोगायची आमची इच्छा नाही, म्हणून आम्ही संन्यस्त होत आहोत.

श्री : असे वयोवृद्ध, तपोवृद्ध ऋषीमुनी तप करताना "ज्ञान कोष", "विज्ञानमय कोषात" जात.
कणादाला अणुरेणुचे कोडं अशाच ध्यानमग्न अवस्थेत सुटलं. आर्य भट्टला भूमितीची प्रमेय
अशीच उलगडली. पाणिनीना व्याकरण असाच स्फुरलं. पतंजली मुनींना योगशास्त्र असच
स्फुरलं.
सौ : किती उच्च विचार. स्वतःचा उत्कर्ष करायचा, कर्तुत्व गाजवायचं, पण स्वार्थ साधल्यावर
परमार्थही साधायचा. त्याग करायचा. स्वतः कधी माजायाचे नाही, दुसऱ्याला कमी
लेखायचे नाही. "अर्थ", "काम" हे पुरुषार्थ साधायचेच. पण त्याबरोबर धर्म आणि मोक्षही
साधायचा. अशा रीतीने चारही पुरुषार्थ साधून आपला मनुष्य जन्म सार्थकी लावायचा.

श्री : हिंदु धर्मात सांगितलेल्या चार चतुष्कांपैकी आपण तीन पाहिली १. चार वर्ण, २. चार आश्रम
३. चार पुरुषार्थ.
चौथ चतुष्क म्हणजे चार ऋण १.मातृ - पितृ ऋण. २. ऋषी ऋण, ३.समाज ऋण ४. देव
ऋण सर्व कर्तव्य बजावत, ऋण फेडत, कृतार्थ राहत जीवन व्यतीत करून शेवटी अनंतात
विलीन व्हायचे. हाच खरा वेदीक धर्म हाच खरा हिंदू धर्म.

सौ : आपल्या धर्मात इतकं शास्त्रशुद्ध आणि practical ज्ञान सांगितलं होत.
कस जगायचं? चार आश्रमात आणि चार वर्णात;
का जगायचं? चार पुरुषार्थ गाजवत.
कोणासाठी जगायचं? चार ऋण फेडण्यासाठी जगायचे.

श्री : हो पण नंतरच्या काळात धर्माच्या नावाखाली जातीयवाद, सतीची चाल, कर्मकांड हे काही
स्वार्थी लोकांनी रूढ केलं.

सौ : महाराष्ट्रात तसेच भारतात अन्य ठिकाणी गेल्या ८०० - ९०० वर्षात अनेक संत झाले.
त्यांनी लोकांना ह्या अनिष्ट प्रथांपासून दूर व्हायला सांगितले. मानवता/ माणुसकी म्हणजेच
धर्म हे सांगितले.

श्री : अशा खऱ्या वेदीक धर्माचे आजच्या युगात पालन करणारे लोक भरपूर आहेत. श्री
वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, आगरकर, वीर सावरकर, गांधीजी, बाबासाहेब
आंबेडकर, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे, स्वामी विद्यानानंद.

सौ : ह्या लोकांनी स्वार्थापेक्षा परमार्थाला, समाजाला, देशाला जास्त महत्व दिलं. म्हणूनच ही
लोकं अमर आहेत.

श्री : वेदीक धर्म हा भांडवलशाहीतील कर्तव्यतत्परता, कार्यकुशलता ज्ञान, विज्ञान, सुबत्ता ह्यांना
पूजतो, त्याचबरोबर समता, बंधुता ह्या साम्यवादी विचारांनाही पूजतो. आणि म्हणूनच, तो
capitalism आणि communism ह्यामधला सुवर्णमध्य आहे. आजच्या कोलाहलात तोच
एकमेव उपाय आहे.

सौ : दोन्ही "isms" मधल्या चांगल्या गोष्टी ज्याच्यात अंतर्भूत आहेत. आणि ह्या दोहोतील वाईट
गोष्टी माहित असून त्यावरील उपाय सांगणारा वेदीक धर्म.

श्री : सबळ, सशक्त सन्माननीय शांतीचा भोक्ता वेदीक धर्म. भ्रष्टाचार व भोगवादावरील उपाय वेदीक धर्म.

सौ : परस्त्री मातेसमान मानणारा वेदीक धर्म, परधान लालसेला पाप मानणारा वेदीक धर्म. पाप पुण्याचे, योग्य, अयोग्य यांचे विश्लेषण देणारा वेदीक धर्म.

बुद्धीला सन्मार्गाचे , सत्कर्माचे, समाजाभिमुखतेचे वळण लावणार वेदीक धर्म.



Saturday, November 14, 2009

"लक्ष्मी हरवली आहे"

लेखक: मनोज लोंढे

पात्रे : ७०- ७५ वर्षीय आजोबा
४५ वर्षीय वडील: श्री
१९ - २० वर्षीय मुलगा: कुमार

काळ : आजचा

प्रसंग : १ मेचा दिवस, सकाळी तिघांचे पेपर वाचन चालू आहे.

पार्श्वसंगीत : "जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा"

कुमार : आजोबा, मुंबई महाराष्ट्रात असावी ह्याकरता आंदोलने का करावी लागली? तिन्ही बाजूंनी महाराष्ट्राने वेढली असतानादेखील, गुजरातने मुंबईवर हक्क कसा काय सांगितला?

आजोबा : कुमार, तुझं म्हणण अगदी बरोबर आहे. भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रात असण स्वाभावीक होत. त्यामळे तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने मुंबई महाराष्ट्राची असल्याचा निर्णय दिला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

श्री : बाबा, तुम्ही म्हणता ते मला भौगोलिकदृष्ट्या पटत आहे. पण तरीही, मुंबई महाराष्ट्राची, असं आपण का म्हणावे?

आजोबा : श्री, तू एक मराठी माणूस असून असं कसं म्हणतोस? संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात किती मराठी लोकांचं रक्त सांडलं आहे हे माहित आहे का तुला?

श्री : बाबा, मी जे बोलतो आहे, ते माझ्या अनुभवातून बोलतो आहे; पूर्ण विचारांती बोलतो आहे.

कुमार : बाबा तुम्हाला नक्की म्हणायचय तरी काय?

श्री : सांगतो कुमार. बाबा, माझ्यापेक्षा तुम्हाला त्याकाळचे जास्त बरोबर सांगता येईल. इंग्लिश लोक गेल्यावर, येथील कारखाने कोणी वाढवले?

आजोबा : बऱ्याचशा कापड गिरण्या इंग्लिश लोक पारशी लोकांना देऊन गेले. बाकी गिरण्या व कारखाने गुजराथी, मारवाडी लोकांनी विकत घेतले, किंवा उभारले.

श्री : आणि सिंधी, पंजाबी लोकांचे काय?

आजोबा : ते लोक फाळणीनंतर आले. प्रचंड हलाखीतून, अत्यंत कष्टाने व बरेचसे धूर्तपणाने ते वर आले. त्यांनीही कारखानदारी, स्वतंत्र व्यवसायात मुसंडी मारली.

श्री : ह्या सर्व आर्थिक उलाढालीमध्ये मराठी माणूस कुठे होता?

आजोबा : अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मराठी कारखानदार होते. पण मराठी लोकांची दुकाने मात्र होती त्याकाळी.

कुमार : खरंच आजोबा? आज तर सर्वत्र गुजराथी, मारवाडी, सिंधी आणि पंजाबी लोकांचीच दुकाने दिसतात. एखादे मराठी माणसाचे दुकान दिसते. ते सुद्धा अगदी जुनाट असते.

आजोबा : अरे गम्मत नाही. खरंच मराठी माणसांची दुकाने होती त्याकाळी. पण दुकानांना छान किंमती मिळाल्या आणि जरा शिकल्यावर नोकऱ्या मिळत होत्या. त्यामुळे ९०% मराठी दुकानदारांनी दुकाने विकून नोकऱ्या पत्करल्या. त्याकाळी धंदेवाईक लोकांशी सोयरीक करायला लोक तयार नसत. त्यांना शिकलेला, नोकरीवाला नवरा मुलगा हवा असे.

श्री : मला नेमकं हेच म्हणायचं आहे. मुंबईतील कारखाने गुजराथी, मारवाडी, पारशी, सिंधी आणि पंजाबी लोकांनी उभारले, वाढवले. आर्थिक धारिष्ट्य ह्याच लोकांनी दाखवलं. त्यांनी आपापसात एकजूट देवळी, एकमेकांना मदत केली. काळाची पावले ओळखून मोठी उत्पादकता असणारे कारखाने उभारले, मोठा नफा कमावला आणि मुंबई आर्थिकदृष्ट्या काबीज केली.

आजोबा : अरे पण मुंबईच्या प्रगतीमध्ये, आर्थिक सुबत्तेमध्ये मराठी माणसाचे श्रेय आहेच की. आता तुझे “Mechanical engineer” काका प्रीमियर ऑटोमोबिलमध्ये Production manager होतेच ना? तुझ्या मावशीचे यजमान Textile engineer होते आणि तेही Bombay dyeing मध्ये Production manager होते. मी स्वतः M. Sc. Analytical chemistry होतो आणि मीही Pharmaceutical industry मध्ये उच्चपदांवर कामे केली आहेत.

श्री : प्रश्नच नाही. तुम्ही सर्वांनी त्याकाळी प्रचंड अभ्यास करून, उच्चपदस्थ नोकऱ्या केल्यात, आम्हाला शिकवलत, घडवलत. तुम्ही स्वतःची कर्तव्ये व्यवस्थित पार पाडलीत. अत्यंत सात्विक, सुसंस्कृत असं आयुष्य तुम्ही जगलात. याचा आम्हाला विशेष अभिमान आहे.

( पार्श्वसंगीत : कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था ...)

कुमार : खरंच आजोबा, आजकालच टी. व्ही. सिरीअलमधील भंगार बोलणे, चालणे बघतो; नंतर तुमचे वागणे बघता ते देवतास्वरूपच वाटत. तुमचं पूजा करणं, संध्याकाळी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हणणे, धूप फिरवणे, सगळे कसे पवित्र, मंगल आणि प्रसन्न वाटते.

आजोबा : अरे हीच आपली मंगलमय अशी संस्कृती आहे. ती जपण आपल कर्तव्य आहे. आणि संध्याकाळी घरी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हटल्याने नको ती प्रलोभने, म्हणजे मित्रांबरोबर दारू पार्टी करणे वगैरे आपसूक होत नाही. तिहेरी फायदा: एक, मुलांना घरी प्रसन्न वातावरण मिळत. दोन : दारूत पैसे वाया जात नाहीत, तीन : त्यामुळे व्यसन लागूच शकत नाही.

कुमार : एव्हढ आदर्श जीवन तुम्ही "साहजिकपणे" जगलात. पण तुम्हाला, किंवा मावशीच्या मिस्टरांना किंवा काकांना कोणालाही स्वतःचा कारखाना काढावासा का वाटला नाही? तुम्ही तुमच्या बुद्धीचा, कौशल्याचा वापर परप्रांतीयांना मोठ करण्यासाठी केलात हे लक्षात येत आहे का तुम्हाला?

आजोबा : (५ सेकंद स्तब्ध). मला हे कधी जाणवलाच नाही. आम्हाला जे मिळत होत, तेच भरपूर होत. त्यात आम्ही सुखी, समाधानी होतो.

श्री : हाच कळीचा मुद्दा आहे. परप्रांतीयांनी पैसा लावला, आर्थिक धोका पत्करला. कारखाने उभारले. तुम्ही तुमचे ज्ञान, कौशल्य त्यांना काही पगाराच्या मोबदल्यात देऊ केलेत. मराठी कामगार तुटपुंज्या पगारावर राबले. आणि परप्रांतीय मोठे झाले.

कुमार : पण आज मी बर्याच मराठी कामगार सदृश माणसांना दारू पिउन रस्त्यात लोळताना बघतो. कफल्लक अवस्थेत त्यांना फिरताना बघून त्यांची कीव येते हो मला.

आजोबा : अरे ह्याच कामगारांना कारखान्यांमध्ये चांगला पगार मिळत असे. ८५ - ८६ साली आमच्या कंपनीत कामगारांना महिना ६००० रुपये पगार होता. तरीसुद्धा त्यांनी जबर संप केले, मारामाऱ्या केल्या. कारखाना बंद पाडला. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. नव्हे, मी तर म्हणेन कुऱ्हाडीवर पाय मारला.मालकांनी सुरत, अंकलेश्वर येथे कारखाना हलवला. कोणालाही
Gratuity, provident fund व इतर retirement benefits, काहीही दिले नाही. म्हणाले जा कोर्टात. मला स्वतःला एक छदामसुद्धा मिळाला नाही. कामगार रस्त्यावर आले. त्यांच्या बायका १० घराची धुणीभांडी करायला लागल्या. कामगार नैराश्याने दारूत आकंठ बुडाले. असेच चित्र सर्व गिरणगावात होते, सर्वत्र संप, मारामाऱ्या आणि नंतर लॉक आऊट. सर्व गिरणगावात अवकळा पसरली होती. तरी दारू पिऊन गणपतीसमोर नाचणे ठरलेले. परप्रांतीय अशा मराठी "मामांना" हसून म्हणत, ह्या लोकांना स्वतःच्या वाईट परिस्थितीबद्दल काहीच कसं वाटत नाही? स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची वाताहत झाली असताना हे दारू पिऊन नाचू कसे शकतात?

( पार्श्वसंगीत : कर्तव्याला मुकता माणूस; माणूस ना उरतो SSS…)

नाही म्हणायला काही कामगारांनी रस्त्यावर बनियन, रुमाल विकायला सुरुवात केली, काहींनी रिक्षा, टक्सी चालवायला सुरुवात केली.

श्री : आणि हे सर्व माझी Career सुरू होताना घडत होते. १९८६ मध्ये मी नामांकीत कॉलेजमधून distinction ने chemical engineer म्हणून उत्तीर्ण झालो. तीन चार वर्षांनी माझ्या शाळेतील गुजराथी मित्र भेटला, Hi, Hello झाल्यावर त्याने विचारले, काय कामधंदा करतोस?
मी मोठ्या अभिमानाने छाती फुगवून सांगितले की मी केमिकल इंजिनीयर आहे, आणि एका नामांकीत Chemical company मध्ये नोकरीला लागलो आहे आणि मला दरमहा ४००० पगार आहे.

तो म्हणाला बस! एव्हढ शिकून एव्हढीच कमाई? मी फक्त १० वी पास आहे. आणि माझी दोन दुकानं आहेत, आणि मी एका दिवसात तुझ्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त पैसे कमावतो.

त्या दिवशी ठरवलं की पाच सहा वर्ष स्वतःची कंपनी असल्यागत रममाण होऊन काम करायचं, जबर अनुभव घ्यायचा, आणि स्वतःचा व्यवसाय काढायचा. आणि जसं ठरवलं तसं केलं.

( पार्श्वसंगीत : आकाशी झेप घे रे पाखरा SS; सोडी सोन्याचा पिंजराSS.)

घर किंवा गाडीसाठी लोन ना काढता ९३ - ९४ साली व्यवसायासाठी एका खाजगी बँकेचे लोन मी काढले. मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा मला मिळाला. शेयर्समध्येही मला भरपूर फायदा झाला. तो सगळा मी आपल्या व्यवसायात ओतला. बाबा तुमच्या आणि माझ्या ज्ञान आणि अनुभवाची शिदोरी घेऊन आपण आपली कंपनी स्थापन केली.

आपलं ज्ञान, अनुभव मोलाचा ठरला. आपण आपले सर्व कामगार मराठीच ठेवले. त्यांना पगार व्यवस्थित दिला. कंपनीच्या जमाखर्चाचा ताळेबंद पारदर्शकपाने सांगत गेलो; त्यामुळे त्यांनीही कंपनीच्या उत्कर्षासाठी आपल्याला उत्तम सहकार्य दिलं. आपणही त्यांना योग्य तो बोनस देत आलो.

कुमार : बरोबर आहे. सुसंवाद असला की वाद होऊच शकणार नाही. ह्यातून दुसर एक शिकायला मिळालं की, आपण जे शालेय, महाविद्यालयीन घेतो ते शेवटी अर्थार्जनासाठी वापरायचे असते. मग नोकरी करून अर्थार्जन मर्यादित का ठेवावे? लोनस् इतक्या सहजी उपलब्ध असताना, स्वतःचा व्यवसाय काढून तल्लीनपणाने काम करून तो वाढवावा. मोठ्या भरार्या माराव्यात.

( पार्श्वसंगीत : भाग्य चालते कर्मपदाने, जाण खऱ्या वेदार्था SSS..)

श्री : Perfect!! प्रचंड ज्ञान घ्यायचे, मग कमाई मर्यादित का ठेवायची? परप्रांतीयांना का मोठे करायचे? आपण होऊन आपल्या राज्याचे अर्थकारण दुसर्यांच्या हातात का द्यावे. मुळात तेच कारखानदारी करू शकतात, आणि आपण त्यांच्याकडे नोकरी करायची हा न्यूनगंड आपण का ठेवायचा? कोणी दुसरा येईल, कारखाना काढेल, व मला नोकरी देईल, हे समीकरण चुकीचे आहे. आपल्या राज्यात आपणच कारखाने काढावेत, वाढवावेत. स्वतःचे ज्ञान स्वतःसाठी वापरून श्रीमंतच व्हायचे. मराठी लोकांनी एकमेकांना मदत करायची. ठरवून मराठी दुकानदारांकडून माल विकत घ्यायचा. मग तो वाणी असो, बेकरीवाला असो, सराफ असो, कपड्याचा दुकानदार असो, व चप्पल बूटवाला असो. मराठी हॉटेलातच जावं. अशानेच मराठी कुटुंबांचे अर्थकारण सुदृढ होईल. सरस्वतीबरोबर, लक्ष्मीपूजन करून मराठी कुटुंब श्रीमंत झाली पाहिजेत. आणि मुंबईचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे अर्थकारण परप्रांतीयांच्या हातून निसटून ते बळकट मराठी हातात आले पाहिजे.

कुमार : आणि मगच आपण ताठ म्हणू शकू की, मुंबई आमची आहे!!

आजोबा : तुम्हा दोघांचे विचार बरोबर आहेत. समस्त मराठी कुटुम्बांचा, समाजाचा साम्पत्तीक उत्कर्ष व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचबरोबर आपण सर्व समाजाभिमुख राहू, समाजाप्रती कृतार्थ राहू, आपल्याकडे दातृत्वगुण असावा अशीही सदिच्छा करतो.


कुमार : तुम्ही दोघांनी किती छान सांगितलत. वर्षापूर्वी १२ वी आणि CET मध्ये कमी मार्क मिळाले, त्यामुळ पाहिजे त्या कॉलेजमध्ये Chemical engineering ला admission मिळाली नाही. त्याचे मला नैराश्य आले होते. पण आपल्या घराच्या व्यवसायाला योग्य म्हणून मी B. Sc. Chemistry ला admission
घेतली.
आता नैराश्य झटकून मी तल्लीन होऊन एकाग्रचित्ताने व्यवसायाभिमुख शिक्षण घेईन. त्यायोगे माझ्या व्यवसायात मी आत्मविश्वासपूर्ण असेन. व्यावसायीक ज्ञान, तल्लीनता, आत्मविश्वास आणि चिकाटी ह्यांच्या बळावर मी आपल्या व्यवसायात कर्तव्यरत होईन, तो वाढवीन. माल विकत घेताना जास्त करून मराठी माणसाकडूनच घ्यायचा प्रयत्न करीन. पण विकताना अशी बंधने ठेवणार नाही. स्वतः श्रीमंत झाल्यावर इतर मराठी व्यावसायिकांना मदत करीन. सतत सत्कर्म करून समाजाचे ऋण फेडायचा प्रयत्न करीन. टिळक, सावरकरांचा वंशज आहे त्याचे सार्थक करीन. आणि हो आजोबा, इतकी वर्ष लक्ष्मी हरवली होती खरी, पण आता लक्ष्मीची आराधना करायला मराठी माणूस शिकला आहे. त्याला लक्ष्मी मिळवायचे सन्मार्ग सापडले आहेत. आणि तो ती मिळवणारच.

आजोबा व श्री : ( आशीर्वाद देत ) तथास्तु!!
( पार्श्वसंगीत : मराठी पाऊल पडते पुढे ....)



मनोज लोंढे